ब्राझीलचे राष्ट्रपतीं फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर

0

नवी दिल्ली : ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लूला दा सिल्वा यांनी सोमवारी आपल्या भारत दौऱ्याची अधिकृत पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की ते फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्लीला भेट देणार आहेत. लूला दा सिल्वा अमेरिकेच्या दौर्‍यावरही जाणार असून, मात्र त्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. अमेरिकेच्या दौर्‍यापूर्वी होणारा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान, फेब्रुवारीमध्ये भारत आणि दक्षिण कोरिया दौरा पूर्ण केल्यानंतर वॉशिंग्टनला भेट देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.आपल्या पोस्टमध्ये लूला दा सिल्वा यांनी लिहिले,“संयुक्त राज्य अमेरिका आणि ब्राझीलची आर्थिक वाढ संपूर्ण क्षेत्रासाठी सकारात्मक आहे. गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले असून, त्याचा परिणाम म्हणून ब्राझीलच्या उत्पादनांवरील लादलेल्या टॅरिफपैकी मोठा हिस्सा हटवण्यात आला आहे.”

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे सांगितले की त्यांनी संघटित गुन्हेगारीविरोधातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. या चर्चेदरम्यान मनी लॉन्डरिंग आणि शस्त्रतस्करी रोखणे, गुन्हेगारी टोळ्यांची मालमत्ता गोठवणे तसेच आर्थिक व्यवहारांबाबत माहितीची देवाणघेवाण यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.

भारत २०२६ मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार असून, ब्राझील हा देखील ब्रिक्सचा सदस्य देश आहे. या परिषदेसाठी इतर राष्ट्रप्रमुखांसह लूला दा सिल्वा भारतात येणार आहेत. लूला सध्या अमेरिकेच्या टॅरिफविरोधात ब्रिक्स देशांसोबत संयुक्त भूमिका घेण्याबाबत चर्चा करत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सवर टीका करत, ब्रिक्स देश राष्ट्रीय चलनांमध्ये व्यापार करून अमेरिकन डॉलर कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला आहे.

अमेरिकेने भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांवर मोठे टॅरिफ लादले आहेत. या तणावपूर्ण वातावरणात जगातील अनेक देश परस्पर व्यापारासाठी नवे पर्याय शोधत आहेत. भारत आणि ब्राझील या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असून, त्या देखील याच दिशेने पावले टाकत आहेत. याच पार्श्वभूमीवर ७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लूला दा सिल्वा यांच्यात सुमारे एक तास दूरध्वनीवर चर्चा झाली होती. आता लूला दा सिल्वा भारत दौऱ्यावर येत असून, या भेटीदरम्यान भारत–ब्राझील संबंधांतील अनेक महत्त्वाच्या करारांवर सहमती होण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech