नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मंगळवारी इंडिया एनर्जी वीक २०२६ ला संबोधित करताना भारत आणि युरोपीय संघ (ईयू ) यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण मुक्त व्यापार कराराची (एफटीए) घोषणा केली. त्यांनी सांगितले की हा करार जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील मजबूत भागीदारीचे प्रतीक असून, त्याचा थेट फायदा भारतातील उद्योग, ऊर्जा क्षेत्र आणि सामान्य नागरिकांना होणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “युरोपीय देशांसोबत भारताने केलेल्या या कराराला जगभरात ‘मदर ऑफ ऑल डील’ असे संबोधले जात आहे. हा करार भारताची उत्पादनक्षमता (मॅन्युफॅक्चरिंग) अधिक बळकट करेल आणि सेवा क्षेत्राला नवे पाठबळ देईल. ते म्हणाले की आज भारत ऊर्जा क्षेत्रात एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. नवीकरणीय ऊर्जा, तेल आणि वायू (ऑइल अँड गॅस) यांसारख्या क्षेत्रांत भारत वेगाने प्रगती करत असून, जगातील अनेक देशांबरोबर सहकार्य करत आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की, आजच्या भारतात प्रत्येक क्षेत्रात सुधारणा होत आहेत. या सुधारणाांमुळे देशातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक अनुकूल झाले आहे आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, हा करार जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील समन्वयाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. या करारामुळे जागतिक जीडीपीच्या सुमारे २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या जवळपास एक-तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व होते. व्यापाराबरोबरच लोकशाही आणि कायद्याच्या राजवटीप्रती आमची सामायिक बांधिलकी हा करार अधिक बळकट करतो.”
पंतप्रधान मोदींनी हेही स्पष्ट केले की, भारत– ईयू एफटीए मुळे भारत आणि ब्रिटन यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या व्यापार करारालाही पाठबळ मिळेल. यामुळे युरोपबरोबर भारताचा एकूण व्यापार अधिक मजबूत होणार आहे.या कराराचा मुख्य उद्देश भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील द्विपक्षीय व्यापार वाढवणे आणि आर्थिक संबंधांना नव्या उंचीवर नेणे हा आहे. सरकारच्या मते, या करारामुळे गुंतवणूक, रोजगार आणि तांत्रिक सहकार्याच्या नव्या संधी खुल्या होतील.
भारत आणि युरोपीय संघामध्ये २००७ पासून एफटीए वर चर्चा सुरू होती. तब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या कराराला मंजुरी मिळाली आहे. युरोपीय संघाच्या वतीने युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डर लेयेन आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सॅंटोस दा कोस्टा यांनी या एफटीए कराराला हिरवा कंदील दाखवला आहे.