तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचे सुटले नियंत्रण
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यावेळी अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. कायम जनसेवेत असलेले अजित पवार आज बारामतीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार सभा घेणार होते. यासाठीच ते सकाळीच मुंबईहून बारामतीसाठी निघाले होते. परंतु साधारण ८:४५ च्या सुमारास विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. प्राथमिक अहवालानुसार लँडिंगच्या वेळी विमानाला तांत्रिक अडचण आली, ज्यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीच्या बाजूला जाऊन आदळले आणि त्यानंतर विमानाने भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिले. हे खूप दुःखदायक आहे. जेव्हा विमान खाली उतरत होते, तेव्हा ते कोसळेल असे वाटले आणि ते कोसळलेच. त्यानंतर त्यात स्फोट झाला. एक मोठा स्फोट झाला. त्यानंतर आम्ही धावत इथे आलो आणि पाहिले की विमानाला आग लागली होती. विमानात पुन्हा ४-५ स्फोट झाले. आणखी लोक इथे आले आणि त्यांनी (विमानातून) लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आग खूप मोठी असल्याने लोक मदत करू शकले नाहीत. अजित पवार विमानात होते आणि ही आमच्यासाठी खूप दुःखदायक गोष्ट आहे. मी हे शब्दांत वर्णन करू शकत नाही…”
महाराष्ट्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विमान अपघाताची चौकशी केली जाईल. अपघातस्थळी सापडलेल्या ढिगाऱ्यांचे स्थान आणि स्थिती काळजीपूर्वक तपासली जाईल आणि विमान कोणत्या वेगावर आणि कोनात आदळले हे समजून घेण्यासाठी छायाचित्रे घेतली जातील. उड्डाणाच्या वेळी विमानाची तांत्रिक स्थिती आणि ते उडण्यासाठी योग्य होते की नाही हे निश्चित करण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी केली जाईल. उड्डाणपूर्व देखभालीशी संबंधित सर्व नोंदी तपासल्या जातील. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये वैमानिकांच्या शेवटच्या क्षणी झालेल्या संभाषणांबद्दल आणि निर्णयांबद्दल माहिती मिळेल. त्रुटीचे कारण निश्चित करण्यासाठी वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) यांच्यातील संभाषणाचा अधिकृत रेकॉर्ड तपासला जाईल. हवामान, धावपट्टीची परिस्थिती आणि वाऱ्याची दिशा यासारख्या बाह्य घटकांचा देखील तपासात समावेश केला जाईल.