राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत शनिवारी होणार निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली. जनतेच्या आणि आमदारांच्या मनात काय हे जाणून घेऊ, उपमुख्यमंत्रिपदाविषयी सुनेत्रा वहिनींशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. दुसरीकडे कुटुंबप्रमुख आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार हे देखील काय मत मांडतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने पक्ष शोकसागरात बुडालेला असताना सुनील तटकरे यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीचा तपशील दिला.
दादांच्या अकाली जाण्याचा आम्हाला झटका बसला आहे. त्यातून आम्ही सावरलेलो नाही. आम्ही शोकमग्न अवस्थेत आहोत. त्यामुळे आज दादांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे हे अत्यंत क्लेशकारक आहे. जिथे त्यांनी पक्षाचे संघटन उभे केले, त्या कार्यालयात त्यांच्याशिवाय जाणे हे पचत नाही. अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे, तिथे जाऊन मी नमस्कार केला, असे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. अजित पवार यांच्या सावडण्याचा विधी सुरू आहे. धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व परिवाराशी चर्चा करू. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करू. जनतेच्या मनातील, आमदारांच्या मनातले जाणून घेऊन पुढील निर्णय घेऊ. चर्चा करून उपमुख्यमंत्रिपदाचं काय ते ठरवू, असे तटकरे यांनी सांगितले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी तयार झाली आहे. त्यांच्या जाण्यानंतर आता उपमुख्यमंत्रिपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडण्यात यावं, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात. राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना असल्याचे म्हटले होते.
तर खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की , विधिमंडळाचे नेते आणि उपमुख्यमंत्री ही जागा अजितदादांकडे होती. याबाबत आम्हाला निर्णय करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं आहे की, आम्ही लवकर निर्णय घेऊ. यासाठी आमच्या पक्षाच्या आमदारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय जनभावना लक्षात घेऊन निर्णय करायचा आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केलेली नाही. पण पक्षाचा निर्णय, आमदारांचा निर्णय आणि आमची स्वतःचीही भावना आहे की आम्ही योग्य निर्णय केला पाहीजे. आम्हाला सुनेत्रा वहिनींशीही बोलावं लागेल, पार्थ पवार, जय पवार यांच्याशी बोलावं लागेल. आमची देखील तशीच भावना आहे. योग्य निर्णय व्हावा अशी इच्छा आहे.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, सुनेत्रा पवारांकडे हे पद देण्याची मागणी माध्यमांमध्ये आणि अनेक लोकांकडून होत आहे. त्या चूक आहेत असं मला वाटत नाही पण शेवटी उद्याच्या (31 जानेवारी) बैठकीतच हा निर्णय होईल. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असणाऱ्या कामांकडे आम्ही लक्ष देतो आहोत. उपमुख्यमंत्री पदाची जागा सुनेत्रा पवारांच्या रूपाने कशी भरता येईल याकडे आमचं लक्ष आहे. उद्याची बैठक ही विधिमंडळ पक्षप्रमुख ठरवण्याची आहे. कदाचित एकमत झालं तर उद्याच्या उद्या शपथविधी सुद्धा होऊ शकतो, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.जर सुनेत्रा पवारांनी आज रात्रीपर्यंत संमती दिली, तर उद्या (शनिवारी) सायंकाळी राजभवनावर त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होऊ शकतो. यासाठी पक्षाने विधानभवन सचिवालयाला पत्र देऊन बैठकीची तयारी पूर्ण केली आहे.