पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ठरण्याची शक्यता
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी अपघाती निधन झाले. त्यानंतर आज, शुक्रवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर उद्या, शनिवारी ३१ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. यात पक्षाचे अध्यक्ष आणि नवे उपमुख्यमंत्री कोण, याचा निर्णय घेतला जाणार आहे. अजित पवारांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर सहमती बनत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित या तातडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, विधान परिषद सदस्य यांना आवर्जुन उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार, उद्याच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता जास्त आहे. सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत, परंतु अजित पवारांच्या रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून आगामी काळात निवडणूक लढवू शकतात. तसेच, उपमुख्यमंत्रिपदही सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले जाऊ शकते, अशी चर्चा पक्षात सकारात्मक स्वरूपाची असल्याचे समजते.राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, सुनेत्रा पवार यांनाच विधिमंडळ नेते करावे, अशी सर्व नेत्यांमध्ये भावना आहे. आज प्राथमिक चर्चा झाली असून, उद्या सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधून अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार, या प्रश्नाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती. मात्र आता पक्षाने स्पष्ट संकेत दिले आहेत की, ही दोन्ही पदे पवार कुटुंबाकडेच राहतील. नेत्यांच्या मते, सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल आणि पक्ष एकसंध राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.