अजित पवारांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट

0

– राष्ट्रवादीसह मंत्रिमंडळातील नेतृत्वाबाबत हालचाली
– लवकरच योग्य निर्णय होईल – प्रफुल्ल पटेल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणासह मंत्रिमंडळात देखील मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ता संतुलन आणि मंत्रिमंडळातील खात्यांच्या पुनर्वाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावीत, अशी भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते.

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ आणि नियोजन, खाते तसेच उत्पादन शुल्क विभागाचा कारभार होता. ही सर्व खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावीत, असा आग्रह या बैठकीत नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बारामती येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत पक्षाची पुढील दिशा, नेतृत्व आणि भविष्यातील राजकीय भूमिका याबाबत चर्चा झाली. त्यानंतर हे सर्व नेते मुंबईत दाखल होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले.

दरम्यान, पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अधिक वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाची मागणी पुढे करत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री, तर पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवावे, अशी भूमिका जाहीरपणे मांडली. सर्वांचीच मागणी आहे की, वहिनींना मंत्रिपदी आणावे. ही जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, असे झिरवाळ यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यास ती अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि पवार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालू राहील, असेही त्यांनी नमूद केले.

प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, देवेंद्र फडणवीसांसोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. फडणवीसांना आम्ही येवढचं सांगितले की, लवकरात लवकर निर्णय करायचा आहे. पक्षातील आमदारांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत. आज इतकेच आम्ही फक्त देवेंद्र फडणवीसांना सांगितलं. सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केली नाही. कोणाला उपमुख्यमंत्रिपदावर बसवायचं हे आमदारांशी बोलून निर्णय घेणार आहोत. सगळ्यांच्या भावना समजून आम्ही निर्णय घेऊ. सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केली नाही, ती आम्ही अंतर्गत चर्चा केली आहे. आम्ही जनभावनेचा, आमदारांचा, आमची स्वत:ची भावना आहे की, योग्य निर्णय केला पाहिजे. अजूनही राजकीय शोक आहे. घरचे कार्यक्रम चालू आहेत. आम्ही सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणार आहोत, किमान घरचे कार्यक्रम आटपून चर्चा करू. लवकरात लवकर आम्ही ही जागा भरु, लवकरच योग्य निर्णय होईल, असं पटेल यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या पश्चात आता दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आलाय. पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेईल अशी माहिती समोर येतेय. मात्र अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असं समजतंय. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका-पुतण्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी झाले होते. मात्र आता अजित पवार नसल्याने पवार कुटुंबीय एकत्र बसून हा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवार यांच्या अचानक जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य, नेतृत्व कोणाकडे जाणार, तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, यासारख्या अनेक प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्यासारखा सर्वमान्य आणि प्रभावी नेता सध्या पक्षाकडे नसल्याने नेतृत्वाचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत पवार कुटुंबातीलच कुणी पुढे येणार की पक्षातील अन्य वरिष्ठ नेते ही जबाबदारी सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पार्थ आणि जय पवार राजकारणात येणार? सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार असून त्या राज्याच्या सक्रिय राजकारणात परत येणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. याशिवाय अजित पवार यांची मुले पार्थ आणि जय पवार यांना भविष्यात पक्षाची अधिक जबाबदारी दिली जाणार का, यावरही चर्चा सुरू आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech