गडचिरोली : गडचिरोली आणि छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आणि माओवाद्यांमध्ये तणावपूर्ण संघर्ष सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत एका पुरुष माओवाद्याला ठार करण्यात यश मिळाले असून, सी-६० पथकाचा एक जवान जखमी झाला आहे. माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या १४ पथकांनी मौजा फोदेवाडा जवळील घनदाट जंगलात शोधमोहीम हाती घेतली. कंपनी क्रमांक १० चे सदस्य आणि छत्तीसगडमधील अज्ञात दलमधील माओवादी या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मोहिमेतील महत्त्वाचे अपडेट्स, दोन तळ उद्ध्वस्त:- काल झालेल्या चकमकीत पोलीसांनी माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त केले. आज सकाळी अतिरिक्त पथक पाठवल्यानंतर चकमकीत एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह सापडला. घटनास्थळावरून एक एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली. जवान जखमी: आज संध्याकाळी माओवाद्यांच्या गोळीबारात सी-६० पथकाचा एक जवान जखमी झाला; त्याला जंगलाबाहेर तातडीने उपचारासाठी काढण्यात आले. पोलीस दलाने सांगितले की, जंगल अत्यंत घनदाट आणि कठीण असल्यामुळे शोधमोहिमेत आव्हाने येत आहेत. आणखी काही माओवादी जखमी किंवा ठार झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, कारवाई पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली पोलीस सविस्तर माहिती देणार आहेत.