कारागृहात ‘कुसुम’ मोहिमेची एंट्री; १६९ बंद्यांची आरोग्य छाननी

0

रायगड : राज्य शासनाच्या ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ शोधमोहीम अभियानांतर्गत अलिबाग जिल्हा कारागृहात विशेष आरोग्य शिबीर घेण्यात येऊन एकाच दिवशी तब्बल १६९ बंदीवानांची कुष्ठरोग तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाने कारागृहात थेट प्रवेश करून राबवलेल्या या तपासणी मोहिमेमुळे आरोग्य यंत्रणेची सज्जता अधोरेखित झाली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, कुष्ठरोग आरोग्यसेवा सहाय्यक संचालक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता.६) हे शिबीर पार पडले. राज्यात २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय गाठण्यासाठी ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विशेष शोधमोहीम राबवली जात असून त्याचाच भाग म्हणून कारागृहात ही मोहीम राबवण्यात आली.

शिबिरादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सकपाळ यांनी बंदीबांधवांना कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे, संसर्गाबाबतच्या गैरसमजुती, आधुनिक उपचार पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. लवकर निदान आणि त्वरित मोफत उपचार यावर विशेष भर देण्यात आला. तपासणी प्रक्रियेत प्रत्येक बंदीवानाची स्वतंत्र आरोग्य पडताळणी करण्यात आली.

या उपक्रमासाठी जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बांदल, वैद्यकीय सहाय्यक भगवान जाधव, लिपिक तेजस मोरे, निम्न वैद्यकीय कर्मचारी राजकुमार गाजुलवार, सांख्यिकी सहाय्यक प्रतिक पाटील, आरोग्य सेवक ऋतिक जाधव, आशासेविका सोनाली जाधव, प्रबोधन सामाजिक सेवा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील तसेच कारागृह कर्मचारी उपस्थित होते. कारागृहासारख्या बंदिस्त ठिकाणीही आरोग्य तपासणी मोहीम राबवल्याने संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech