अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी परदेशात पाठवला जाण्याची शक्यता

0

तपास यंत्रणांच्या अहवालाला वेळ, रोहित पवारांनी घेतली खासगी गुप्तहेरांची मदत

मुंबई / नवी दिल्ली : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आधीच व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार सध्या दिल्लीत असून तिथे विविध स्तरावर हवाई क्षेत्रात वैमानिक व अन्य पदांवर राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा अहवाल येण्यास वेळ लागू शकतो, असे काही जणांचे मत आहे. मात्र, हा अहवाल लवकरात लवकर मिळावा, यासाठी रोहित पवार हे खासगी गुप्तहेरांची मदत घेत असल्याची माहितीही आता समोर येत आहे. तसेच अपघातग्रस्त विमानचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी परदेशात पाठवला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याची शक्यता बोलून दाखवली होती. सरकारने या अपघाताची चौकशी लावण्यापलीकडे फार काही केले नव्हते. त्यामुळे आता रोहित पवार यांनी आपल्या काकांच्या विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यासाठी दिल्लीतच ठाण मांडल्याचे दिसून येत आहे. त्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेल्या स्थितीत असल्याने त्यातील माहिती संकलनासाठी तो परदेशात पाठवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती समोर येताच आमदार रोहित पवार यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट करून अजितदादांसोबत घातपात झाल्याच्या संशयाला बळ मिळाले असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

दुसरीकडे अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाताला तब्बल २० वा दिवस होत असून अद्यापही डीजीसीएकडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही. तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या व्हीएसआर कंपनी विरोधात देखील काहीही कारवाई झालेली नाही. परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे डीजीसीएने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच व्हीएसआरवर योग्य ती कारवाई करावी, अशी पोस्ट रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या या विमान दुर्घटनेची संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. मात्र, या सगळ्यातून अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत निर्माण झालेले संशयाचे धुके अधिकच गडद होताना दिसत असल्याची शंका व्यक्त होत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech