नवी दिल्ली : किरकोळ महागाईनंतर, घाऊक महागाई दरात आता सलग तिसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये घाऊक महागाई दर १.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो गेल्या नऊ महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. या अगोदर डिसेंबरमध्ये घाऊक महागाई दर ०.८३ टक्के होता. सोमवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) महागाई सलग तिसऱ्या महिन्यात वाढून १.८१ टक्के झाली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये घाऊक महागाई दर २.५१ टक्के होता, जो डिसेंबर २०२५ मध्ये ०.८३ टक्के होता. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरात ही वाढ अन्नपदार्थ, अन्नेतर वस्तू आणि उत्पादित उत्पादनांच्या किमतींमध्ये महिना-दर-महिना वाढ झाल्यामुळे झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जानेवारीमध्ये महागाई दरात वाढ प्रामुख्याने मूलभूत धातू, इतर उत्पादित वस्तू, अन्नेतर वस्तू, अन्नपदार्थ आणि कापडांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झाली.
अन्नधान्य आणि उत्पादित वस्तूंच्या किमतीत वाढ : उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, जानेवारी २०२६ मधील महागाई वाढीमागे मूलभूत धातू उत्पादन, इतर मॅन्युफॅक्चरिंग, अन्नेतर वस्तू, अन्नपदार्थ आणि कापड उद्योगातील वाढीव किमती हे मुख्य कारण आहे. आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये अन्नपदार्थांचा महागाई दर १.५५ टक्के होता, जो डिसेंबरमध्ये ०.४३ टक्क्यांनी घसरला होता. भाज्यांच्या महागाई दरात जानेवारीत ६.७८ टक्के घट झाली असली तरी, उत्पादित उत्पादनांमधील घाऊक महागाई दर डिसेंबरमधील १.८२ टक्के वरून वाढून जानेवारीत २.८६ टक्के झाला आहे.
इंधन आणि वीज क्षेत्रात दिलासा, पण खाद्यपदार्थ महागले : अन्न श्रेणीतील होलसेल महागाई दराने मोठी झेप घेतली असून तो डिसेंबरमधील २.९५ टक्क्यांवरून थेट ७.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाई दरात घसरण कायम असून जानेवारीत तो ४.०१ टक्के राहिला (डिसेंबरमध्ये हा दर २.३१ टक्के होता). घाऊक महागाईसोबतच रिटेल महागाईचा दरही महत्त्वाचा असून, गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार जानेवारीत किरकोळ (रिटेल) महागाई दर २.७५ टक्के नोंदवला गेला आहे.
जानेवारीमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) वर आधारित देशातील किरकोळ महागाई दर देखील २.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ महागाईचा परिणाम थेट ग्राहकांवर होत असतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय व्याजदर ठरवताना प्रामुख्याने किरकोळ महागाईचा विचार करते. महागाई कमी पातळीवर असल्यामुळे आरबीआयने चालू आर्थिक वर्षात व्याजदरात १.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र अलीकडेच रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. अन्नपदार्थ आणि मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्यामुळे ही वाढ झाली. नवीन ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) मधील हे पहिले आकडे आहेत, ज्याचे आधार वर्ष २०२४ आहे.