मुंबई : राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरावरील वर्चस्वावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून सातत्यांने एकमेकांना आव्हान आणि प्रतिआव्हान दिले जात आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता उद्धवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुली ऑफर दिली आहे. भाजपामध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही परत यावं, अशी ऑफर राऊत यांनी दिली आहे.
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, हा भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एक दिवस एकनाथ शिंदे यांना तुरुंगात जावं लागेल, असे गणेश नाईक म्हणत आहेत. मात्र त्यांना पाठबळ मिळतंय का? तर नाही. गणेश नाईक यांना ही लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही. पाठबळ असेल तर कारवाई व्हायला हवी. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधील एका मंत्र्यावर पोरकटासारखे हल्ले करताहेत. ते पाहता माझं गणेश नाईक यांना आवाहन आहे की, तुम्हाला ही लढाई भाजपामध्ये राहून कधीच लढता येणार नाही. तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलं आहे. तुम्ही स्वगृही आलं पाहिजे. तुम्ही शिवसेनेच्या मूळ प्रवाहात आलं पाहिजे आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे.