कल्याण : कल्याण रेल्वे स्थानका वर गर्दीच्या वेळी धक्कादायक प्रकार घडला. लोकलमध्ये गर्दीच्या वादातून अनेकदा शाब्दिक चकमकी उडतात. मात्र रेल्वे स्थानकात एका महिलेने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचे समोर आले. मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात चढताना झालेला वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. या वादातून एका अज्ञात महिलेने दुसऱ्या महिला प्रवाशाच्या हाताच्या दंडाचा जोरात चावा घेतला. त्यानंतर तिचे बोट पिरगळून तिला जखमी केले.
कल्याण रेल्वे स्थानक येथे मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक ६ वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणारी फास्ट लोकल येत असताना प्रथम श्रेणी महिला डब्याजवळ मोठी गर्दी झाली होती. काही महिला उतरण्याचा प्रयत्न करत होत्या, तर काहीजणी आत चढण्यासाठी धडपड करत होत्या. याच गोंधळात कल्याणमध्ये राहणाऱ्या आणि अंधेरी येथे नोकरीस जाणाऱ्या प्रियंका थोरात या डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होत्या.
डब्यातून उतरणाऱ्या एका अनोळखी महिलेने त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र ती स्वतः नीट उतरत नसल्याने दरवाज्यात अडथळा निर्माण झाला आणि दोघींमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही क्षणांतच हा वाद झटापटीत परिवर्तित झाला. संतापलेल्या त्या महिलेने प्रियंका यांच्या हाताला पकडून त्यांच्या दंडाला चावा घेतला तसेच बोट जोरात वाकवले. या प्रकारात प्रियंका जखमी झाल्या आणि त्यांना तीव्र वेदना सहन कराव्या लागल्या. उपस्थित प्रवाशांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोघींना वेगळे केले.
घटनेनंतर प्रियंका थोरात यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयित महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार तिचा शोध सुरू असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. जखमी प्रियंका यांना प्राथमिक उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे उपनगरी रेल्वेतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांनी संयम व शिस्त पाळणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.