नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हैदराबाद हाऊस येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांची भेट घेतली. दोघांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील भारताच्या कामावर आणि भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांसोबत गुगलच्या सहकार्यावर चर्चा केली. पंतप्रधानांनी एका एक्स-पोस्टमध्ये लिहिले की, सुंदर पिचाई यांना भेटून त्यांना आनंद झाला. त्यांनी सांगितले की, ही चर्चा एआय क्षेत्रातील भारताच्या प्रयत्नांवर आणि गुगल प्रतिभावान विद्यार्थी आणि व्यावसायिकांना कसे जोडू शकते यावर केंद्रित होती.
य भेटीनंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या सोशल मीडियीवरील एक्स पोस्टमध्ये लिहीले की, आज सकाळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. आरोग्य सुधारण्यासाठी, सर्व भाषांमध्ये माहितीची उपलब्धता वाढविण्यासाठी, स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी, शेतीसाठी आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी भारतातील सर्व स्तरांवर एआयचा वापर करण्याच्या त्यांच्या मोहिमेत गुगल कशी मदत करत आहे यावर आम्ही चर्चा केली. या अविश्वसनीय शिखर परिषदेसाठी आम्हाला एकत्र आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. दरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी सुरू झालेली ही शिखर परिषद जगातील अशा प्रकारची चौथी आहे हे विशेष आहे.