श्रीनगर–बारामुला महामार्गावर आयईडी निष्क्रिय; मोठा अनर्थ टळला

0

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे घातपाताचा मोठा प्रयत्न उध्वस्त झालाय. श्रीनगर–बारामुला राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला जिहादी दहशतवाद्यांनी पेरलेला भूसुरूंग (आयईडी) सुरक्षा दलांना वेळीच शोधून नष्ट केलाय. दरम्यान या परिसरात सुरक्षा दलांनी मोठी शोध मोहिम हाती घेतली आहे. यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार सुरक्षा दलाचे जवान आज, बुधवारी सकाळी या परिसरात गस्तीवर असताना महामार्गाच्या कडेला एक संशयास्पद पॅकेट आढळून आले. संभाव्य धोक्याची जाणीव होताच जवानांनी तातडीने परिसर ताब्यात घेतला आणि संपूर्ण भागाची नाकेबंदी केली.

सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर तत्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुरक्षा नियमांचे पालन करून संशयित वस्तूची तपासणी करण्यात आली आणि ती सुरक्षितरीत्या निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या दरम्यान सुरक्षारक्षकांनी विशेष दक्षता घेतली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात उच्च सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी आसपासच्या गावांमध्ये व निवासी भागांत शोधमोहीम तीव्र केली आहे. सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी ड्रोन आणि शोधक श्वान पथकाच्या साहाय्याने परिसराची बारकाईने तपासणी सुरू केली असून अन्यत्र स्फोटके लपवलेली आहेत का याचा शोध घेतला जातोय.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech