(अनंत नलावडे)
मुंबई : केंद्रिय निवडणूक आयोगाने बुधवारी देशभरात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागासाठीही त्याचवेळी निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ.भागवत किशनराव कराड, डॉ.फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील,रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा कार्यकाळ येत्या २ एप्रिल रोजी संपणार आहे. या निवडणुकीची २६ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२६ असेल.अर्जांची छाननी ६ मार्च रोजी केली जाणार असून ९ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. मतदान १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.