कर्नाटकच्या बागलकोटमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू
बागलकोट : बागलकोट येथे शिवाजी जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची घटना घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने संबंधित भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यासंदर्भातील माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता जुन्या शहर भागातून मिरवणूक सुरू झाली होती. ही मिरवणूक मशिदीजवळून जात असताना दूरवरून दोन दगड फेकण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. याबाबत पोलिस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी सांगितले की, मिरवणुकीसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. “आम्ही घटनास्थळी उपस्थित होतो. मिरवणूक मशिदीजवळ पोहोचताच आमच्या दिशेने २ दगड फेकण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, एक दगड एका पोलिस कर्मचाऱ्याला लागला, तर दुसरा त्याच्या खांद्यावर पडला. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. घटनेनंतर मिरवणूक सुरळीतपणे पुढे सुरू राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून मिरवणुकीचे चित्रीकरणही करण्यात आले होते. संबंधित चित्रफितींचा आढावा घेण्यात येत असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ अंतर्गत बागलकोटच्या काही भागांत १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून २४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशांनुसार सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच घातक शस्त्रे बाळगणे, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृतींमध्ये सहभागी होणे आणि पूर्वपरवानगीशिवाय सभा, समारंभ किंवा आंदोलन आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले आहे.