बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह व समित्यांचे कामकाज थेट प्रक्षेपित करा

0

अनिल गलगली यांची मागणी

मुंबई: लोकशाही व्यवस्थेमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा थेट सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माननीय महापौर व महापालिका आयुक्त यांना पत्र देऊन सभागृह तसेच विविध समित्यांचे कामकाज थेट (Live Streaming) प्रक्षेपित करण्याची मागणी केली आहे.

महानगरपालिकेच्या सभागृहासह स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती आदी महत्त्वाच्या समित्यांमध्ये होणाऱ्या चर्चांबाबत सध्या नागरिकांना मर्यादित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे जनहिताच्या विषयांवर गैरसमज व अफवा पसरतात. थेट प्रक्षेपण सुरू झाल्यास निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे गलगली यांनी नमूद केले आहे.

थेट प्रक्षेपणामुळे लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर सार्वजनिक देखरेख राहील. अफवा व चुकीच्या माहितीला आळा बसेल. तरुण पिढीमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता वाढेल. देशातील अनेक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांनी यशस्वीपणे Live Streaming ची अंमलबजावणी केली असताना, मुंबई महानगरपालिकेनेही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा उपक्रम तातडीने राबवावा, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे..याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech