सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी हाती धरला भगवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील येवला लासलगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून आपल्या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी शिंदे म्हणाले की, नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देतो. तसेच आमदार नरेंद्र दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पक्षात प्रवेश करत असल्याने पक्ष दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे मत व्यक्त केले.

आज झालेल्या पक्षप्रवेशमात प्रामुख्याने राष्ट्रवादी अल्पसंख्याक विकास सोसायटीचे अध्यक्ष शकील पटेल, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, येवला मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष सुभाष गांगुर्डे, छावा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अविनाश देशमुख, भटक्या आणि विमुक्त जमाती महासंघाचे अध्यक्ष शरद राऊत, उबाठा महिला संघटक किर्ती निरगुडे, माजी नगरसेवक जयश्री बर्डे, संतोष थोरे, दिगंबर दवनडे आणि असंख्य पदाधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे, कुणाल दराडे तसेच जिल्हाप्रमुख भाऊसाहेब तांबडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून पक्ष दिलेला शब्द पाळतो, असे सांगत शिंदे यांनी नव्या सदस्यांना पक्षाच्या बळकटीसाठी चांगले काम करण्याचे आवाहन केले. तसेच गरीब कुटुंबातील कार्यकर्त्यालाही शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली असल्याचा उल्लेख करत पक्ष कार्यकर्त्यांना नेहमीच संधी देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे अभिनंदन करत त्यांच्या माध्यमातून शिवसेना आणखी मजबूत होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.