ठाणे : जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास सक्षम नेतृत्व घडते, यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मीरा-भाईंदरजवळील उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ मार्च २०२६ रोजी ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ या दोन दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, पद्मश्री पोपटराव पवार, प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळपाटील, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, अपर तहसिलदार निलेश गौड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढणे ही काळाची गरज आहे. महिलांना योग्य संधी दिल्यास त्या प्रभावी नेतृत्व घडवू शकतात आणि समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शासनाच्या विविध योजनांद्वारे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लखपती दीदी’ योजनेंतर्गत यावर्षी ३७ लाख महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्रातील महिलांनी देशात अग्रक्रम मिळवला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या परिषदेत देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुमारे ५०० ग्रामीण महिलांचा सहभाग असून, व्यवसाय, उद्योग, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या यशस्वी वाटचालीचे अनुभव या व्यासपीठावरून मांडले जाणार आहेत. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करताना, महाराष्ट्रातील निवडून आलेल्या तसेच भविष्यात निवडून येणाऱ्या महिला सरपंचांसाठी प्रशिक्षण शिबिरे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात यावीत, अशी सूचना केली. यामुळे सुशासनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.