विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

0

मुंबई : विधानभवन परिसरात अधिवेशन काळात एक धक्कादायक प्रकार घडला. राज्याच्या विविध भागांतून आपल्या समस्या आणि तक्रारी घेऊन अनेक नागरिक मंत्रालय आणि विधानभवन परिसरात येत असतात. आपल्या प्रश्नांवर शासन दरबारी तोडगा निघेल या आशेने ते आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांची भेट घेतात. मात्र काही वेळा निराशा पदरी पडल्याने काही नागरिक आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त करतात. अशाच प्रकारची घटना आज विधानभवन परिसरात घडली असून एका व्यक्तीने अंगावर केरोसीन ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, दादासो बबन कलसैत (वय ३८ वर्षे, रा. टाकळी, ता. माढा, जि. सोलापूर) या व्यक्तीने विधानभवन परिसरातील उषा मेहता चौकात स्वतःवर केरोसीन ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी ही बाब लक्षात घेत तत्काळ धाव घेतली आणि त्याला पकडून आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला पुढील चौकशीसाठी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गावातील नगरपंचायतीने लोहार समाजाच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेला भगवान विश्वकर्मा यांचा पुतळा हटवला होता. या घटनेमुळे कलसैत नाराज होते. याच नाराजीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२६ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, विधानभवन परिसर हा अत्यंत संवेदनशील आणि सायलंट झोन मानला जातो. तरीही या परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech