कोकणातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मदत जाहीर करणार…..!

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

(अनंत नलावडे)
मुंबई : आंबा व काजू हे कोकणची ओळख असून कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या आंबा व काजू फळ पिकाचा यंदा आलेला मोहोळ गळून पडल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात ही मदत जाहीर करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आंबा व काजू प्रश्नाबाबत विधानभवनात आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना सांगितले.

बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, रोहयो व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, दीपक केसरकर, भास्कर जाधव, महेंद्र दळवी, निलेश राणे, राजेंद्र गावित, प्रसाद लाड, किरण सामंत, ज्ञानेश्वर म्हात्रे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी बैठकीत सहभाग घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे नुकसानीची तीव्रता लक्षात येत असून अशा प्रकारच्या नुकसानीच्या परिस्थितीत यापूर्वी कशाप्रकारे मदत केली आहे. त्यामुळे या संदर्भातील सर्व बाबींचा सांगोपाग विचार करून मदत देण्यात येईल. याबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री, फलोत्पादन व कृषी मंत्री तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींचे मतही विचारात घेण्यात येईल. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी बैठकीत सादरीकरण केले.तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींनी आंबा व काजू नुकसानीची माहिती विषद करीत मदतीची मागणी केली. यावेळी कोकणातील लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech