पुणे : सध्या जगभरात युद्धग्रस्त परिस्थिती असल्याचे आढळून येत आहे. एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी असून या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘युद्ध नको, बुद्ध हवा’, हा संदेश जगासाठी उद्बोधक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली व बौद्ध अध्ययन विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संमेलनाध्यक्ष बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या पाली विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बिमलेन्द्र कुमार, गगन मलिक, भदंत हर्षबोधि महाथेरो, डॉ योजना भगत, उपमहापौर परशुराम वाडेकर, धम्मदीप वानखेडे, डॉ. करुणा जाधव, डॉ नीरज बोधी, स्वागताध्यक्ष डॉ सिद्धार्थ धेंडे, डॉ. गौतम चाबुकस्वार, संयोजक राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. पाली भाषेने जगाला ज्ञान प्रदान केले आहे. विज्ञानवाद, समानता, मानवता आणि शांततेचे ज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान पाली भाषेतूनच जगभरात पोहोचले आहे.