रायगड : राज्याला मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी शासनासोबतच समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा नेत्र रुग्णालय आणि शंकरा आय फाउंडेशन इंडिया यांच्या कार्याचा गौरव करत केले. मुख्यमंत्र्यांच्या मते, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टरांचा कार्यसंघ आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून या संस्थांनी हजारो रुग्णांना दृष्टीदान करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले हे मॉडेल आरोग्यसेवेचे आदर्श उदाहरण आहे.
रुग्णालयात मोतीबिंदू, रेटिना, ग्लॉकोमा, कॉर्निया आणि बाल नेत्ररोगांवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात सेवा दिली जाते. ग्रामीण भागात नेत्रतपासणी शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांना उपचारासाठी आणण्याचे काम सातत्याने सुरू आहे. जून २०२१ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत १,४२८ मोफत शिबिरांद्वारे २,३८,६०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर ४३,४३५ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. या रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांना मोफत उपचार प्रदान करण्यात आले. तसेच, महत्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत ७५३ गंभीर नेत्ररुग्णांना लाभ मिळाला.
‘रेनबो – आय हेल्थ प्रोजेक्ट’ अंतर्गत रायगड, नवी मुंबई आणि एमएमआरडीए परिसरातील 1.38 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करून हजारो चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या उल्लेखनीय कार्याबद्दल रेखा झुनझुनवाला आणि डॉ. आर. व्ही. रमानी यांचे अभिनंदन केले.