मुंबई : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात गेल्या महिनाभर तणावपूर्ण स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल आणि गॅस तुटवड्यासंदर्भात विविध तर्क-वितर्क पसरवले जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपल्या देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे कोणतेही संकट नाही. देशात कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही, तशा आशयाच्या अफवा जर कुणी परसवत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
फडणवीस म्हणाले की, देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही, हे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे या विषयी कोणतीही अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे फेक व्हॉट्सॲप मेसेज जरी फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल. त्यामुळे कुणीही खोट्या अफवा पसरवूू नये, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार. सध्या कोणतीही टंचाई नाही. भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शट डाऊनची परिस्थिती आली आहे. अशा वेळी भारतात मात्र घरगुती गॅसची कोणतीही कमतरता भासत नाही. त्यामुळे अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लावू नयेत. आपल्याकडे एक महिना चालेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. नागरिकांनी घाबरून जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास पुरवठा आणि मागणी यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो आणि कृत्रिम टंचाई उद्भवू शकते. त्यामुळे नेहमीप्रमाणेच इंधन भरावं, असे आवाहन केलं आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे १० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतींचा भार हा आता तेल कंपन्याच सहन करणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल-डिझेलची खरेदी करावी लागणार नाही. जनतेला विनंती आहे की, त्यांनी दररोज ज्याप्रमाणे आवश्यक तेवढेच इंधन भरता, तसेच भरावे. कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये. देशात घरगुती गॅस किंवा पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.