मुंबई : प्रसिद्ध उद्योजक आणि रेमंड ग्रुपला जागतिक दर्जावर नेणारे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी मुंबई येथे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. दूरदृष्टी असलेले उद्योगपती, दानशूर व्यक्तिमत्व आणि धाडसी वैमानिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे उद्योग आणि विमान वाहतूक क्षेत्रातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सिंघानिया कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दि. २९ रोजी दुपारी १:३० वाजता मुंबईतील एल.डी. रुपारेल मार्ग येथील ‘हवेली’ येथे अंत्यदर्शन सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी ३:०० वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
विजयपत सिंघानिया यांचे पुत्र आणि रेमंड ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. १९३० च्या दशकात जन्मलेल्या विजयपत सिंघानिया यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने रेमंड समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यांच्या काळात रेमंड हा कापड उद्योगातील एक मजबूत आणि विश्वासार्ह ब्रँड बनला. उद्योग क्षेत्राबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान दिले. त्यांना विमान उड्डाणाची विशेष आवड होती आणि त्यांनी हॉट एअर बलूनमधून सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला होता. या कामगिरीसाठी त्यांना मानद ‘एअर कमोडोर’ ही पदवी देण्यात आली होती.
उद्योगविश्वातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मभूषण सन्मानाने गौरव
उद्योग आणि समाजातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण या सन्मानाने गौरविण्यात आले होते. जवळपास दोन दशके रेमंडची धुरा सांभाळल्यानंतर २००० साली त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी पुत्र गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली होती. त्यांच्या जाण्याने भारतीय उद्योगविश्वातील एक प्रेरणादायी अध्याय संपला आहे.