पणजोबाच्या पावलावर रणबीरचे पाऊल, ९२ वर्षांपूर्वी पृथ्वीराज कपूर यांनी साकारले होते श्रीराम

0

मुंबई : नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत असल्याने सध्या मोठी चर्चा सुरू आहे. आज हनुमान जयंंतीच्या मुहुर्तावर या चित्रपटाचा पहिला टीझर समोर आला आहे. या निमित्ताने कपूर कुटुंबातील एक अत्यंत जुना आणि ऐतिहासिक योगायोग समोर आला आहे. रणबीर कपूरचे पणजोबा आणि भारतीय सिनेसृष्टीचे दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनीही मोठ्या पडद्यावर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली होती.

जवळपास ९२ वर्षांनंतर कपूर कुटुंबातील चौथी पिढी पुन्हा एकदा तोच वारसा पुढे नेत आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव राज कपूर, नातू ऋषी कपूर यांनी अनेक अजरामर भूमिका केल्या, मात्र श्रीरामांची ही भूमिका साकारण्याची संधी आता थेट पणतू रणबीर कपूरला मिळाली आहे. या योगायोगामुळे कपूर कुटुंबाचे चाहते भारावून गेले आहेत. नितेश तिवारींच्या रामायणमध्ये रणबीर कपूरच्या राम लूकवर खूप मेहनत घेतली जात आहे.

टीझरमध्ये त्याची छोटीशी झलक पाहून प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले आहे. पणजोबांनी १९३४ मध्ये जो आदर्श घालून दिला होता, तोच वारसा रणबीर २०२६ मध्ये कशा प्रकारे पडद्यावर उतरवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळी २०२६ मध्ये रामायण सिनेमाचा पहिला भाग रिलीज होणार आहे. रणबीर आणि पृथ्वीराज कपूर यांचे हे खास कनेक्शन पाहून चाहते मात्र थक्क झाले आहेत. सर्वांनी रणबीरवर पणजोबांचा आशीर्वाद आहे असे कौतुक केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech