मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी भाजप नेते तथा राज्यमंत्री नितेश राणे यांच्याविरुद्ध जामीन पात्र वाॅरंट जारी केले आहे. संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. दरम्यान, या प्रकरणी माझगावच्या न्यायालयात ही केस सुरू असताना नितेश राणेंनी दुसऱ्या कोर्टात या केसची सुनावणी व्हावी, अशी मागणी करत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयाने नितेश राणेंची ही मागणी फेटाळली होती.
त्यानंतरच्या दोन्ही तारखांना राणे हजर न राहिल्याने माझगाव कोर्टाने आता नितेश राणेंविरोधात जामीन वाॅरंट जारी केले आहे. त्यामुळे आता राणे यांना न्यायालयात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे. सत्तांतराच्या नाट्यकाळात संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. मे २०२३ मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा उल्लेख साप म्हणून केला होता. यानंतर संजय राऊतांनी नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता.
नितेश राणे यांनी हे विधान म्हणजे माझी सार्वजनिक बदनामी असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. संजय राऊत यांच्या याचिकेनुसार, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा १० जूनपूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा सार्वजनिक दावा नितेश राणे यांनी केला होता. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं होतं. या संदर्भात संजय राऊत यांनी तक्रार देखील दाखल केली होती.