नवी दिल्ली : दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग भारत दौऱ्यावर असून. सोमवारी राष्ट्रपती भवन प्रांगणात त्यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून औपचारिक स्वागत करण्यात आले. याशिवाय, कोरियन राष्ट्रपती ली यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती ली यांच्यासोबत दक्षिण कोरियाच्या प्रथम महिला किम ही क्यूंग हेदेखील भारतात आल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने राष्ट्रपती ली यांच्या या दौऱ्याला दोन्ही देशांतील विशेष रणनीतिक भागीदारी पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रपती ली पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. दोन्ही नेते विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करणार आहेत. यामध्ये जहाजबांधणी, व्यापार, गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, लोकांमधील संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवरही चर्चा होणार आहे.
यापूर्वी रविवारी दिल्ली विमानतळावर पोहोचलेल्या ली जे म्युंग यांचे स्वागत केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी केले. त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राष्ट्रपती ली यांची भेट घेतली. जयशंकर यांनी भारत-दक्षिण कोरिया संबंध अनेक क्षेत्रांत अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या बांधिलकीचे कौतुक केले. तसेच पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची त्यांची चर्चा विशेष रणनीतिक भागीदारी आणखी मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी मान्यवर पाहुण्यांच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन करणार आहेत.