कबड्डी सामन्यावर पैज लावल्याचा आरोप
बेंगळुरू : कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, बेंगळुरू येथील न्यायालयाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कबड्डी सामन्यादरम्यान ५०० रुपयांची कथित पैज लावल्याच्या प्रकरणाशी हा वाद संबंधित आहे. ही घटना तुमकुरू येथे आयोजित राज्यस्तरीय प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज कबड्डी स्पर्धेदरम्यान घडल्याचे सांगितले जाते. या स्पर्धेत गृहमंत्री परमेश्वर यांनी जिल्हाधिकारी शुभा कल्याण यांच्यासोबत मैत्रीपूर्ण स्वरूपात ५०० रुपयांची पैज लावल्याचा आरोप आहे. त्यांनी विजयपुरा संघ सामना जिंकेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, दक्षिण कन्नड संघाने विजयपुरा संघाचा ३६-२६ असा पराभव करत विजय मिळवला. यानंतर विजेत्या संघाला पारितोषिक देताना परमेश्वर यांनी सार्वजनिकरीत्या या पैजेचा उल्लेख केल्याचेही सांगितले जाते.
या प्रकरणी एच. आर. नागभूषण नावाच्या व्यक्तीने खासगी तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, अगदी विनोदाने जरी असले तरी पैज लावणे कायद्याच्या विरोधात असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असे वर्तन करणे अनुचित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.या तक्रारीवर सुनावणी घेतल्यानंतर बेंगळुरूच्या 42व्या अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना एफआयआर नोंदवून प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या न्यायालयाचे अध्यक्ष न्यायाधीश के.एन. शिवकुमार आहेत. विशेष म्हणजे, पोलिस विभाग हा गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतो आणि त्याची जबाबदारी स्वतः गृहमंत्री यांच्याकडेच असते, त्यामुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.