आयपीएल २०२६: केकेआरचा सुपर ओव्हरमध्ये विजय, लखनऊची गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर घसरण

0

लखनऊ : आयपीएल २०२६ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात १५६ धावांचे लक्ष्य गाठताना एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. केकेआरचा गोलंदाज कार्तिक त्यागीला शेवटच्या चेंडूवर ७ धावा वाचवायच्या होत्या, पण मोहम्मद शमीने षटकार मारून सामना बरोबरीत आणला. यामुळे आयपीएल २०२६ च्या हंगामातील पहिला सुपर ओव्हर खेळला गेला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना, लखनौचा संघ सुनील नरेनचा सामना करू शकला नाही. नरेनने केवळ १ धावेत २ बळी घेतले. त्यानंतर केकेआरने सहजपणे लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. केकेआरच्या सुपर ओव्हरमधील विजयाचा शिल्पकार सुनील नरेन ठरला.

लखनऊविरुद्ध खेळताना केकेआरची सुरुवात खराब झाली. सलामीवीर टिम सेफर्ट शून्यावर आणि अजिंक्य रहाणे केवळ १० धावांवर बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा अंगक्रिश रघुवंशी स्थिरावण्यापूर्वीच, क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. यामुळे केकेआरची धावसंख्या 4 बाद 31 अशी झाली. त्यानंतर कॅमरॉन ग्रीन काही काळ संघर्ष करत राहिला आणि त्याने २१ चेंडूंमध्ये तीन षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. दरम्यान, रिंकू सिंगने एकहाती सूत्रे हाती घेतली आणि शेवटच्या षटकात दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकले. तो सात चौकार आणि पाच षटकारांसह ५१ चेंडूंमध्ये ८३ धावांवर नाबाद राहिला. रिंकूच्या शानदार खेळीच्या जोरावर, प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ७ विकेट्स गमावून १५५ धावा केल्या.
दरम्यान, मोहसिन खानने लखनऊसाठी उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला पाच बळींचा टप्पा गाठला. मोहसिनने ४ षटकांत २३ धावा देऊन ५ बळी घेतले आणि एक निर्धाव षटकही टाकले.

एलएसजीसाठी पाच बळी घेणारे गोलंदाज
५/१४ – मार्क वूड विरुद्ध दिल्ली, लखनऊ, २०२३
५/२३ – मोहसिन खान विरुद्ध केकेआर, लखनऊ, २०२६
५/३० – यश ठाकूर विरुद्ध गुजरात, लखनऊ, २०२४
१५६ धावांचे लक्ष्य गाठताना, लखनऊच्या एडन मार्करामने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २७ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. मिचेल मार्श ३ चेंडूंमध्ये २ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या. एके वेळी लखनौची धावसंख्या ५ गडी बाद ९३ होती आणि विजयाची जबाबदारी आयुष बडोनीवर होती.पण, बडोनी १९ चेंडूंमध्ये २४ धावांवर बाद झाला. अखेरीस संघाला ६ चेंडूंमध्ये १७ धावांची गरज होती.

अंतिम षटकात, कार्तिक त्यागीने पहिले तीन चेंडू कमरेच्या वर टाकले, जे नो-बॉल घोषित करण्यात आले. तथापि, हिम्मत सिंगला याचा फायदा घेता आला नाही. त्यानंतर त्याने पहिल्या वैध चेंडूवर चौकार मारला, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. १० चेंडूंमध्ये १९ धावा करून हिम्मत सिंग पॅव्हेलियनमध्ये परतला. विजयासाठी शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना, मोहम्मद शमीने षटकार मारला. यासह, लखनौने २० षटकांत ८ गडी गमावून १५५ धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

केकेआरकडून सुपर ओव्हर टाकण्यासाठी सुनील नरेन गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर निकोलस पूरनला बाद केले. त्यानंतर ऋषभ पंतने एक धाव घेतली आणि तिसऱ्या चेंडूवर, रोव्हमन पॉवेलने सीमारेषेवर एक उल्लेखनीय कामगिरी करत रिंकू सिंगसोबत एडन मार्करामचा फटका झेलला. यामुळे लखनौला केकेआरसमोर दोन धावांचे लक्ष्य ठेवता आले. त्यानंतर रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून केकेआरला या हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला, तर लखनऊला या हंगामातील सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech