शताब्दी रुग्णालय मेडिकल महाविद्यालय प्रकल्पाबाबत त्वरित निर्णय घेण्याची अनिल गलगली यांची मागणी

0

मुंबई : आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीष भांदिर्गे यांना पत्र पाठवून शताब्दी रुग्णालय मेडिकल महाविद्यालय प्रकल्पाबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

अनिल गलगली यांनी म्हटले आहे की, शताब्दी रुग्णालय मेडिकल महाविद्यालय प्रकल्पासंदर्भातील निविदा प्रक्रिया गेल्या काही काळापासून प्रलंबित असून यापूर्वीही निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनावश्यक विलंब होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्रकल्प हा नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा असल्याचे गलगली यांनी नमूद केले. त्यामुळे आणखी वेळ न दवडता पालिकेने पारदर्शक आणि ठोस निर्णय घेऊन प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता किंवा विशिष्ट कंपनीला लाभ मिळावा यासाठी नव्याने मुदतवाढ देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. निविदा प्रक्रियेत सहभागी असलेल्या पात्र संस्थांपैकी योग्य संस्थेची निवड करून प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री हरीष भांदिर्गे तसेच पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा अनिल गलगली यांनी व्यक्त केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech