दुर्मीळ ‘हंताव्हायरस’ विषाणूचा प्रादुर्भाव, क्रूझवर तिघांचा मृत्यू

0

लंडन : अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या एका आलिशान क्रूझ शिपवर ‘हंताव्हायरस’ या दुर्मीळ विषाणूचा संशयास्पद प्रादुर्भाव झाल्याने खळबळ उडाली आहे. या भीषण घटनेत एका वृद्ध दांपत्यासह एकूण तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अन्य किमान तीन जण गंभीर आजारी आहेत. ‘ जहाजावरील प्रवाशांमध्ये अचानक श्वसनाचे तीव्र विकार आणि तापाची लक्षणे दिसून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बाधित प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असली, तरी या संसर्गाच्या वेगवान प्रसारामुळे क्रूझवरील इतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सध्या जहाजावर कडक निर्बंध लादले असून बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू केली आहे.

उंदराच्या माध्यमातून प्रसार : हंताव्हायरस हा प्रामुख्याने उंदीर किंवा तत्सम कृंतक प्राण्यांच्या विष्ठा, लघवी किंवा लाळेच्या माध्यमातून पसरतो. मानवांमध्ये या विषाणूचा प्रवेश दूषित हवेतील धुलीकण श्वासावाटे आत गेल्याने किंवा थेट संपर्कामुळे होतो, ज्यामुळे ‘हंताव्हायरस पल्मोनरी सिंड्रोम’ (एचपीएस) सारखा जीवघेणा आजार उद्भवू शकतो. क्रूझसारख्या बंदिस्त आणि मर्यादित जागेत हा प्रादुर्भाव नेमका कसा झाला, याचा सखोल तपास आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणा करत आहेत. जहाजावरील स्वच्छता आणि अन्न-पाण्याची सुरक्षा आता संशयाच्या भोवऱ्यात असून, या घटनेमुळे सागरी पर्यटनातील आरोग्यविषयक नियमावली अधिक कडक करण्याची मागणी होत आहे. सध्या हे जहाज जवळच्या बंदराकडे वळवण्यात आले असून, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech