राज्यपालांच्या पुढाकाराने मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये टीबी मुक्त भारत अभियान राबवणार

0

मुंबई : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबवले जाईल व राज्याचा आरोग्य विभाग, मुंबई महानगर पालिका तसेच रेड क्रॉस सोसायटी व विद्यापीठांना या कार्यात सहभागी केले जाईल, अशी सूचना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केली. राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ५ मे) रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेची बैठक संपन्न झाली तसेच राज्यातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरुंची स्वतंत्रपणे बैठक झाली, त्यावेळी राज्यपालांनी ही सूचना केली.

पंतप्रधानांच्या सूचनेनुसार देशव्यापी टीबी मुक्त भारत अभियान राबवले जात आहे. परंतु लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये क्षयरोगाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील कुर्ला तसेच इतर भागांमधील झोपडपट्ट्यांमध्ये टीबीमुक्त भारत अभियान राबवले जाईल असे राज्यपालांनी जाहीर केले.

क्षयरोगाची तपासणी लवकर झाल्यास क्षयरोगावर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे आरोग्य विभाग व पालिकेतर्फे क्षयरोग तपासणी केली जाईल, तर टीबी संदर्भात माहिती, शिक्षण व जनजागृतीचे कार्य रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेतर्फे केले जाईल असे राज्यपालांनी सांगितले. या अभियानात एनसीसी, स्काऊट – गाईड, रोटरी क्लब, युवा रेड क्रॉस स्वयंसेवक यांना देखल सहभागी करुन घेतले जाईल, असे राज्यपालांनी सांगितले. क्षय रुग्णांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्याचे राज्यपालांनी सांगितले.

रेड क्रॉस सोसायटीने विद्यापीठांसोबत कार्य करावे व त्यांना देखील आपल्या कार्यात सहभागी करून घ्यावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. रेड क्रॉस सोसायटीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्य जोमाने सुरु ठेवावे तसेच ज्या जिल्ह्यांमधील कार्य थांबले आहे तेथे नव्याने सुरु करावे अशी सूचना राज्यपालांनी केली. ज्या जिल्ह्यातर्फे उत्कृष्ट कार्य केले जाईल त्यांना लोक भवनातर्फे योग्य बक्षीस दिले जाईल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या मदतीने क्षयरोगाचा प्रादुर्भाव असलेल्या झोपडपट्ट्या शोधण्याच्या कार्यात विद्यापीठाने मदत करावी अशी सूचना राज्यपालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली. रेड क्रॉस सोसायटीच्या बैठकीला महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष सुरेश देवरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते तर विद्यापीठांच्या बैठकीला मुंबई, ‘बाटू’ व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech