एसटीच्या “NCMC” कार्डची जादा दराने विक्री केल्यास थेट परवानाच रद्द करणार……..!

0

परिवहन मंत्र्यांचा एजंटांना दणका…..

(अनंत नलावडे)
मुंबई : एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) विक्रीमध्ये मनमानी करणाऱ्या एजंट्सना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी मोठा दणका देत सक्त इशारा दिला की, जर सवलतधारक प्रवाशांकडून कार्डासाठी जादा पैसे अधिकृत विक्रेते उकळत असतील अशा विक्रेत्यांचे थेट परवानेच तात्काळ प्रभावाने रद्द केले जातील. कारण याआधी काही केंद्रांवर आधीच कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

सध्या राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात सवलत धारकांसाठी नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात आता परिवहन मंत्री सरनाईक यांनी आज घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे अवाजवी दर आकारून कार्ड वितरित करणाऱ्या विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सध्या एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यातही महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे आता तरी कार्ड वितरण प्रक्रियेत पारदर्शकपना येईल अशी अपेक्षाही सरनाईक यांची व्यक्त केली.

महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार असून त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे.तसेच, NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे.त्यात सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech