कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात सुरू असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले सोशल मीडिया प्रोफाइल अपडेट केले आहे. तर शपथविधीनंतर सुवेंदु अधिकारी यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये नावासमोर मुख्यमंत्री हा शब्द जोडला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्सवर ममता बॅनर्जी यांनी आता आपल्या प्रोफाइलमध्ये स्वतःला तीन वेळा मुख्यमंत्री असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, त्या १५ वी, १६वी आणि १७ वी विधानसभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत आणि सध्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. मात्र त्यांनी कुठेही ‘माजी मुख्यमंत्री’ या शब्दाचा वापर केलेला नाही.
यापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्समध्ये ‘मुख्यमंत्री’ असे लिहिलेले होते, मात्र अलीकडील राजकीय घडामोडींनंतर हा बदल समोर आला आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून दावा करण्यात आला होता की पक्षाचा पराभव झाला नसून कटकारस्थान करून त्यांना हरवण्यात आले आहे. तर ममता बॅनर्जी यांनी आधीच स्पष्ट केले होते की त्या राजीनामा देणार नाहीत आणि हा एक राजकीय कट असल्याचे त्यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे, २०११ मध्येही बंगालमध्ये सत्तांतर झाले होते, जेव्हा ३४ वर्षांच्या डाव्या आघाडीच्या सत्तेचा अंत झाला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी निकालानंतर राजीनामा दिला होता. मात्र यावेळी ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाही आणि आता सोशल मीडिया बायोमधील बदलानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.