टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण
नाशिक : नाशिकातील बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएसमध्ये कथित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात फरार असलेली आरोपी निदा खान हिला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नाशिकरोड न्यायालयात हजर केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला असून, आता तिची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) निदा खानच्या जबाबाच्या आधारे आणखी काही आरोपींची समोरासमोर चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्य संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचाही ताबा एसआयटी घेणार असून, तिघांना एकत्र बसवून चौकशी करण्यात येणार आहे. या तपासातून या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतात का, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मार्च महिन्यात देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र निदा खान फरार होती. दरम्यान, मुंबई नाका पोलिसांनी या गुन्ह्यात कट रचणे आणि धार्मिक भावना दुखावल्याबाबतची अतिरिक्त कलमेही लावली आहेत. निदा खानकडून जप्त करण्यात आलेल्या १७१ डिजिटल लिंक्सचा तांत्रिक तपास तसेच आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी एसआयटीने न्यायालयाकडे कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
एमआयएम नगरसेवकाने दिल्याचा आश्रय : पोलिसांच्या तपासानुसार, २६ मार्चपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमच्या नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी आश्रय दिल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला संबंधित फ्लॅट हा निदाच्या नातेवाईकाचा असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिस पडताळणीत निदाचा त्या फ्लॅटशी कोणताही संबंध नसल्याचे उघड झाले.तसेच निदा गर्भवती असताना तिला आर्थिक मदत कोणी केली आणि तिच्या वास्तव्यासाठी मदत कोठून मिळाली, याचाही तपास एसआयटीकडून सुरू आहे.
पीडितेची ओळख बदलण्याचा कट : तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली असून, देवळाली कॅम्प परिसरातील पीडितेची मूळ ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न निदा खानने केल्याचा आरोप आहे. पीडितेचे नाव बदलून ‘हानिया’ असे ठेवण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, निदा खान स्वतः पीडितेच्या घरी जाऊन तिला विशिष्ट धर्माचे शिक्षण देत होती. तसेच धार्मिक पेहराव परिधान करण्यास भाग पाडणे आणि विशिष्ट प्रार्थना करण्यास सक्ती करणे, अशा प्रकारे पीडितेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.