प्रतिक यादवला मृत्यूपूर्वी ६ जखमा, पोस्टमॉर्टममध्ये खुलासा

0

लखनऊ : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव (वय ३८) यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या दरम्यान प्रतीक यांचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला आहे. लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीने (केजीएमयू) दिलेल्या या अहवालात काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

प्रतिक यादवच्या शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) अहवालानुसार त्यांच्या मृत्यूचे कारण ‘मॅसिव पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम’ असे सांगितले गेले आहे. म्हणजेच फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन श्वसन व हृदयक्रिया बंद पडणे. अहवालात त्यांच्या शरीरावर मृत्यूपूर्वी झालेल्या सहा जखमांचाही उल्लेख आहे. या जखमा ‘अँटीमॉर्टम’ (मृत्यूपूर्वीच्या) असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.अहवालात असेही नमूद केले आहे की संपूर्ण हृदय आणि पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिक घटक फॉर्मालिनमध्ये जतन करून हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच शरीरातील अंतर्गत अवयवांचे (विसेरा) नमुने रासायनिक तपासणीसाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहेत.

फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने अहवालात अनेक महत्त्वपूर्ण बाबी नोंदवल्या आहेत. पुढील तपासणीसाठी हृदय व संबंधित नमुने सुरक्षित ठेवण्यात आले असून सखोल परीक्षण केले जाणार आहे. विसेरा नमुन्यांचे रासायनिक विश्लेषण करून मृत्यूच्या इतर संभाव्य कारणांचाही शोध घेतला जाणार आहे.अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की शरीरावर आढळलेल्या सर्व जखमा मृत्यूपूर्वीच्या आहेत. पोलिस आणि तपास यंत्रणा आता वैद्यकीय अहवाल व रासायनिक विश्लेषणाच्या आधारे पुढील तपास करत आहेत. कुटुंबाने माहिती दिली आहे की प्रतीक यादव यांचे अंतिम संस्कार गुरुवारी १४ मे रोजी दुपारी १२:३० वाजता लखनऊ येथील पिपरा घाट येथे करण्यात येतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech