आता पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजित पवार’ यांचे नाव…….!

0

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

(अनंत नलावडे)
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून पुण्यात नाविन्यपुर्ण अशा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती.त्यातून देशी गायींच्या मौल्यवान व दुर्मिळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या महत्त्वाच्या बाबींवर या केंद्रामार्फत कार्य सुरू करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या पश्चात या केंद्रास त्यांचेच नाव देऊन त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक करण्यात आली“ असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी येथे दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रास “दि.अजित पवार” यांचे नाव देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे “अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र” असे नामकरण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णयही (क्र. २०२६०५१३१३८२१२५०१) कृषी विभागाने जारी केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्या १२२ व्या बैठकीत या केंद्राला “अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र” असे नाव देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

कृषीमंत्री भरणे म्हणाले, “देशी गायींचे संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य शासन सक्षमपणे काम करत आहे. पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला दि.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यात आल्याने या कार्याला आणखी नवी ओळख आणि बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech