नवी दिल्ली : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक राजकीय संघटनेचे ट्विटर अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांत सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘कॉक्रोचजनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट शेअर करून या घडामोडीला दुजोरा दिला. त्यांनी उपहासाने लिहिले, “अपेक्षेप्रमाणेच, ‘कॉक्रोचजनता पार्टीचे अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.” सध्या, एक्सवर त्यांचे हँडल @CJP_2029 शोधल्यावर ‘अकाउंट विथहेल्ड’ (Account Withheld) अशी नोटीस दिसत आहे. या नोटीसनुसार, एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून हे अकाऊंट केवळ भारतीय भौगोलिक क्षेत्रात ब्लॉक करण्यात आले आहे.
सीजेपी नावाची ही ऑनलाइन मोहीम १६ मे रोजी सुरू झाली. देशातील काही बेरोजगार तरुणांच्या वृत्तीचे वर्णन करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी वापरलेल्या “झुरळ” या शब्दाला प्रतिसाद म्हणून ही मोहीम सुरू झाली होती. दीपक यांनी लिहिले होते, “जर सर्व झुरळे एकत्र आली तर काय होईल?” यानंतर, सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टीनावाची एक ऑनलाइन मोहीम सुरू झाली आणि लोक त्यात झपाट्याने सामील होऊ लागले. इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या बाबतीत, सीजेपीने केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षालाही मागे टाकले आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टीची वेबसाइटही सुरू झाली असून, पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेत न पाठवणे, सभागृहातील जागांची संख्या न वाढवता महिलांना ५० टक्के आरक्षण देणे आणि पक्ष बदलून निवडणूक लढवण्यावर खासदार आणि आमदारांवर २० वर्षांची बंदी घालणे, अशा मागण्यांचा समावेश आहे.