श्रीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज, सोमवारी काश्मीरमध्ये प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी काश्मीरविरोधात मोठी कारवाई करत मध्य आणि दक्षिण काश्मीरातील अनेक भागांमध्ये छापेमारी केली. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी आणि राष्ट्रविरोधी कारवाया पुन्हा सक्रिय करण्याच्या कथित प्रयत्नांच्या तपासाच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली. एनआयएच्या पथकांनी जम्मू-काश्मीर पोलिस आणि अर्धसैनिक दलांच्या मदतीने श्रीनगरमधील लाल बाजार परिसर तसेच दक्षिण काश्मीरातील शोपियां जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम सुरू केली.
शोपियां जिल्ह्यातील झैनापोरा येथील मुलू चित्रगाम परिसरातील एका व्यक्तीच्या घरावरही छापा टाकला. सदर इसमाचा संबंध जमात-ए-इस्लामीशी असल्याचा संशय असून तो पूर्वी शोपियां जिल्ह्याचा ‘अमीर-ए-जमात’ म्हणून कार्यरत होता. तसेच त्याचा जामिया सिराज-उल-उलूम इमाम साहिब संस्थेशीही संबंध असल्याचे सांगितले जात आहे.याशिवाय, शोपियांमधील इमाम साहिब भागात असलेल्या जमात-ए-इस्लामीशी संबंधित सिराज-उल-उलूम संस्थेमध्येही तपास आणि झडती घेण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि भारतविरोधी प्रचाराला चालना देण्यासाठी जमात-ए-इस्लामीच्या कारवाया पुन्हा सुरू करण्याच्या कथित प्रयत्नांचा एनआयए तपास करत आहे. त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान, फेब्रुवारी २०२४ मध्ये केंद्र सरकारने ‘जमात-ए-इस्लामी जम्मू-कश्मीर’ या संघटनेला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत ५ वर्षांसाठी ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित केले होते.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जमात-ए-इस्लामीवर दहशतवादाला प्रोत्साहन देणे, फुटीरतावादी विचारसरणीला पाठिंबा देणे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रविरोधी कारवायांना खतपाणी घालण्याचे आरोप आहेत.