‘धुरंधर २’मुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका ? दिल्ली उच्च न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

0

नवी दिल्ली : ‘धुरंधर 2’ या चित्रपटावर अधिकृत गोपनीयता कायद्याच्या (ऑफिशियल सीक्रेट्स ऍक्ट) नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला (सीबीएफसी) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. ‘धुरंधर 2’ संदर्भात सशस्त्र सीमा बलाचे हेड कॉन्स्टेबल दीपक कुमार यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, चित्रपटात भारतीय सशस्त्र दलांच्या गुप्त मोहिमांशी संबंधित माहिती दाखवण्यात आली असून त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

याचिकाकर्त्यांच्या मते, ‘धुरंधर 2’मध्ये अनेक ठिकाणे स्पष्टपणे दाखवण्यात आली आहेत. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि मृत जवानांची माहितीही उघडपणे दर्शवण्यात आली आहे. ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचिकेत असेही नमूद करण्यात आले आहे की, या चित्रपटात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांनी विकसित केलेल्या एका औषधाचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच सेन्सॉर बोर्डाला या मुद्द्यावर विचार करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

न्यायालयाने म्हटले की, ‘धुरंधर 2’ हा जरी काल्पनिक कथानकावर आधारित चित्रपट असला तरी याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. तसेच सेन्सॉर बोर्डाकडे अशा प्रकरणांसाठी काही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे असणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. “आम्ही त्यांना विचारपूर्वक निर्णय घेण्याचे निर्देश देऊ,” असे न्यायालयाने सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech