पिंपरी-चिंचवडमध्ये २४ तासांत ८ जणांचा संशयास्पद मृत्यू

0

पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड इथल्या फुगेवाडी तसेच पिंपळे गुरव परिसरात गेल्या २४ तासात ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विषारी दारूमुळे हे मृत्यू झाले असावेत असा संशय व्यक्त केला जातोय. स्थानिक पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरू केलाय. यासंदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फुगेवाडी परिसरात मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या घटनांमुळे काही तासांतच ८ जणांचा मृत्यू झाला, तर आणखी २ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या सामूहिक मृत्यूंमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनांमागे अवैध आणि बंदी असलेली हातभट्टी दारू कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पोलीस आणि प्रशासनाकडून विविध शक्यतांचा तपास सुरू असून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृतांमध्ये पाडुरंग फुगे, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, राजू रजपुत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई आणि आनंद निकाळजे यांचा समावेश आहे. तर सुभाष डिगीकर आणि अक्षय अवसरमल हे दोघे गंभीर आजारी आहेत. यापैकी सुभाष यांच्यावर मेडी-पॉईंट हॉस्पीटल आणि अक्षयवर यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेमुळे फुगेवाडी परिसरातील आनंदवन, काटे वस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या भागांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषतः राठोड कुटुंबावर आलेल्या दु:खामुळे परिसर सुन्न झाला आहे. राठोड कुटुंबातील 2 सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलीस पुढील तपास करत असून या घटनेमागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech