नवी दिल्ली : विनेश फोगाट यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या आशांना मोठे बळ मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी विनेश फोगाट यांना आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली. त्यामुळे स्टार महिला कुस्तीपटू आता ३० मेपासून सुरू होणाऱ्या ट्रायल्समध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, “जर दुसरी कुणी व्यक्ती असती तर प्रकरण वेगळे असते. त्यांनी देशाचा गौरव वाढवला आहे.” मात्र, या प्रकरणाच्या चौकशीची पद्धत आणि हाताळणीबाबत न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयांचा सहज आणि तातडीने होणारा हस्तक्षेप ही चिंेतेची बाब असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या विनेश फोगाट यांना खेळण्याची परवानगी देणाऱ्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाट यांना सांगितले, “तुम्ही उत्कृष्ट खेळाडू आहात, पण देश प्रथम आहे.” सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांनी मौखिक निरीक्षण नोंदवताना म्हटले, “हे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासारखे प्रकरण नाही. ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची बाब आहे. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करून संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत होऊ नये.”