नाशिक : टीसीएस प्रकरणांमध्ये निदा खान विरोधात न्यायालयात पहिला खटला ९ जून पासून सुरू होणार आहे. दरम्यान जहाल इस्लाम धर्मप्रचारकांच्या ध्वनिफितीच्या मदतीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून पाकिस्तान कनेक्शन देखील या माध्यमातून स्पष्ट होत आहे. नाशिक मधील TCS प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ निर्माण केली असून आता या प्रकरणात दरदिवशी नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिने मोठी कबुली दिली आहे. तिने धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. या बाबतचा जबाब दोषारोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. शिवाय निदा खानचं पाकिस्तान कनेक्शनही समोर आलं आहे.
एसआयटी दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार, निदा खानने पीडित तरुणीचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी त्यांना वादग्रस्त पाकिस्तानी प्रचारक तारिक जमील आणि भारताचा फरार प्रचारक झाकीर नाईक यांचे प्रक्षोभक व्हिडिओ पाहण्यास भाग पाडलं, याबाबतची धक्कादायक कबुली निदा खानने दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात या जबाबाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक येथील मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ८ गुन्ह्यांच्या खटल्याची पहिली सुनावणी आगामी ९ जून रोजी सुरू होणार आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पीडित हिंदू तरुणीच्या मनात स्वतःच्या धर्माबद्दल शंका आणि संशय निर्माण व्हावा, याकरिता एका विशिष्ट नियोजनानुसार तिचे ‘ब्रेनवॉश’ करण्यात आले. झाकीर नाईकच्या जिहादी आणि प्रक्षोभक व्हिडिओच्या लिंक पीडितेला पाठवून, ते व्हिडिओ पाहण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात आला. निदा खानने स्वतः या जिहादी लिंक पीडितेला पाठवल्याचे कबूल केलं आहे.
“जर तू इस्लाम धर्म कबूल केलास, तर तुझा सर्व मानसिक ताण आणि समस्या दूर होतील,” असं भासवून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला. संशयित आरोपी दानिश शेख याने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिचे शारीरिक व लैंगिक शोषण केलं. तसेच पीडितेला जीन्स आणि टॉप घालण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. त्याऐवजी तिला सलवार-कुर्ता घालण्याची सक्ती करण्यात आली आणि बुरखा कसा घालावा, याचं विशेष प्रशिक्षणही देण्यात आलं, असं दोषारोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.