अखेर टीएमसीचा माजी आमदार जहांगीर खानला अटक

0

– नेपाळला पळण्याच्या प्रयत्नात असताना झाली अटक
– खुनाचा प्रयत्न, खंडणीसह अनेक गुन्ह्यांमध्ये होता वॉन्टेड

कोलकाता : तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चा माजी आमदार आणि फलता विधानसभा मतदारसंघातील अलीकडील निवडणुकीतील पक्षाचा उमेदवार जहांगीर खान याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ)ने नेपाळच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून अटक केली आहे. तो देश सोडून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जहांगीर खान फरार होता आणि पोलिस त्याचा शोध घेत होते. पश्चिम बंगाल पोलीस आणि एसटीएफला त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांप्रकरणी त्याचा शोध होता.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, जहांगीर खानविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे, दंगल भडकवणे यासह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये एकूण सात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, त्याच्याविरुद्ध मनी लॉन्डरिंगचाही गुन्हा दाखल असून त्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करत आहे.एसटीएफने जहांगीर खानपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक पाळत (टेक्निकल सर्व्हिलन्स) वापरली. त्याच्या एका निकटवर्तीय सहकाऱ्याचा मोबाईल फोन ट्रॅक करण्यात आला आणि त्याच्या आधारे तपास पथक जहांगीर खानपर्यंत पोहोचले.

दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने यापूर्वी जहांगीर खानला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. मात्र, त्या संरक्षणाची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने ती वाढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याच्या अटकेची शक्यता अधिक बळावली होती.राजकीयदृष्ट्याही जहांगीर खान अलीकडील निवडणुकांदरम्यान चर्चेत होता. टीएमसीने त्याला फलता विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्याने अचानक निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची घोषणा केली होती.

निवडणुकीदरम्यान वरिष्ठ आयपीएस अधिकारी जय पाल शर्मा यांना कथित धमकी दिल्याप्रकरणीही तो चर्चेत आला होता. त्यावेळी त्याने चित्रपटातील “पुष्पा” शैलीत “आम्ही झुकणार नाही” असे वक्तव्य केल्याची चर्चा होती.फलता विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवाराने विजय मिळवला होता.जहांगीर खानच्या अटकेसंदर्भात आणि पुढील कारवाईबाबत पश्चिम बंगाल एसटीएफ लवकरच पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech