नाशिक टीसीएस प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर

0

धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप

नाशिक : नाशिकमधील एका बहुचर्चित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याच्या कथित लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात नवे तपशील समोर आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दाखल असलेल्या ९ गुन्ह्यांबाबत न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर केले असून, २०२२ ते २०२६ या कालावधीत घडलेल्या कथित घटनांचा तपशील त्यात नमूद करण्यात आला आहे. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, मुख्य आरोपी निदा खान हिच्या चौकशीत काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. तपासादरम्यान पीडितेचे नाव बदलून तिचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, पीडितेला नमाज पठणाचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही चौकशीत समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. तपासादरम्यान पीडितेच्या मोबाईल फोनमधून इस्लाम धर्माशी संबंधित अनेक ऑडिओ क्लिप आणि काही ऍप्स आढळून आल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, पीडितेला विशिष्ट धार्मिक साहित्य, व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील सामग्री दाखवून तिच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.चार्जशीटनुसार, आरोपी दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान यांनी संगनमत करून पीडितेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडितेला नोकरी मिळवून दिल्यानंतर तिच्यावर मानसिक आणि धार्मिक दबाव टाकला, तसेच तिच्या धार्मिक भावना दुखावतील अशी वक्तव्ये केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मुख्य आरोपी दानिश शेख याच्यावर लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा, आर्थिक फसवणूक केल्याचा आणि जातीवाचक अपमान केल्याचा आरोप आहे. तर तौफिक अत्तार याच्यावर कार्यस्थळी विनयभंग केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, पीडितेला तिच्या इच्छेविरुद्ध धार्मिक आचारांचे पालन करण्यास भाग पाडणे, विशिष्ट पोशाख परिधान करण्यासाठी दबाव टाकणे आणि धार्मिक कारणांमुळे भीती निर्माण करून मानसिक छळ करणे अशा गंभीर आरोपांचाही समावेश आहे.या प्रकरणातील आणखी एक आरोपी मतीन पटेल याने मुख्य आरोपीला अटक टाळण्यासाठी आश्रय दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.दरम्यान, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पोलिसांनी न्यायालयात विविध पुरावे सादर केल्याचे सांगितले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech