नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा तणावाचे ढग दाटून आले आहेत. इराण, हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात जोरदार क्षेपणास्त्र हल्ल्यांची देवाणघेवाण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची प्रवास सूचना (अॅडव्हायजरी) जारी केली आहे. तेहरानस्थित भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, “प्रदेशातील अलीकडील घडामोडी लक्षात घेता, भारतीय नागरिकांनी इराणचा प्रवास टाळावा, असा पूर्वीचा सल्ला आम्ही पुन्हा देत आहोत. सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी उपलब्ध वाहतूक सुविधांचा वापर करून शक्य तितक्या लवकर देशाबाहेर पडावे.”
दरम्यान, इराणकडून इस्रायलवर डागण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यांमुळे जेरुसलेमसह रामल्ला आणि मृत समुद्र (डेड सी) परिसरातील भागांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. दुसरीकडे, येमेनमधील बंडखोर गटाने इस्रायलवरील हल्ल्याची पुष्टी करत, जाफा परिसरातील इस्रायलच्या संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम इराणमधील केरमानशाह शहराच्या आसपास आज सकाळी शत्रूच्या संभाव्य हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई संरक्षण प्रणाली (एअर डिफेन्स सिस्टिम) सक्रिय करण्यात आली.