पिंपळेश्वर महादेव मंदिराला स्वर्णिम इतिहास प्राप्त करून देण्याचं काम करू
महायुतीचे सरकार हे सनातन धर्माचा पुरस्कार करणारे सरकार
श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर कृतज्ञता सोहळा संपन्न
कल्याण : पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या एका संघर्षाला विराम मिळाला असून महादेव भक्तांचा विजय असून पिंपळेश्वर महादेव मंदिराला स्वर्णिम इतिहास प्राप्त करून देण्याचं काम करू असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत केले. डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरभूमी संघर्षाला ऐतिहासिक यश मिळाले. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पिंपळेश्वर महादेव मंदिरात महापूजा संपन्न झाली. यावेळी आयोजित कृतज्ञता सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुलभा गायकवाड, किसन कथोरे, राजेश मोरे, पिंपळेश्वर मंदिर देवस्थान समितीचे पंढरीनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे आदींसह इतर अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागांव, सोनारपाडा येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर देवस्थान मंदिराची जागा संस्थेला सामाजिक कार्यासाठी देण्याची विनंती सातत्याने सरकारकडे ट्रस्ट करीत होती. संस्थेचे धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक कार्य पाहता मागील अनेक वर्षे वहिवाटीत असलेली सुमारे सव्वाचार एकर जागा राज्य सरकारने एकमताने ठराव करून नाममात्र दरात श्री पिंपळेश्वर देवस्थानाला देण्यात आलेली आहे. याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी मान्यवरांचा भव्य जाहीर सत्कार समारंभ पिंपळेश्वर महादेव देवस्थान मंदिर, सागांव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि, पिंपळेश्वर मंदिराला मिळालेल्या जागेसाठी आम्ह्री निमित्तमात्र असून याचे सर्व श्रेय महादेवाला आहे. सद्ध्या जागांचे वाढलेले भाव लक्षात घेता महादेवाची जागा हडपण्याचा डाव घालण्यात आला. पोलीस आणि गुंड हि जागा हडपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र शिवभक्त आपल्या भक्तीवर ठाम होते. हि जागा या देवास्थानला देण्यामागे अडचणी खूप होत्या मात्र उद्योग आणि महसूल विभागाने या अडचणी दूर केल्या. आज हि सर्व जमीन पिंपळेश्वर महादेवाला अर्पित झाली असून तो स्वर्णिम इतिहास प्राप्त करून देण्याचं काम करू. महायुतीचे सरकार हे सनातन धर्माचा पुरस्कार करणारे असून आम्ही इतर कोणत्या धर्माचा तिरस्कार करत नसून जेव्हा जेव्हा सनातन धर्मावर हल्ला होईल तेव्हा खंबीरपणे उभं राहू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
हा जागेचा विषय नसून श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न सोडविल्या बद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बोलतांना या पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी झालेला संघर्ष हा मोठा असून याबाबत सर्व मंत्रीमंडळाचे आभार मानले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर येथील हिंदूंचे प्रश्न सहज सुटतील असे सांगितले.