सुनेत्रा ताईंची नवीन खेळी

0

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्यसभेचा नवीन उमेदवार देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. सुनेत्रा ताईंच्या हाती पक्षाची सूत्रे आल्यापासून खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना साईडलाईन केल्याची चर्चा माध्यमात बरीच रंगली. परंतु या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. पक्षाचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ यांची नाराजी ओढवून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देऊन तटकरे यांच्या कुटुंबाला तिसरा लोकप्रतिनिधी दिला.

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने कोकण आणि पुणे या दोन्ही जागा भाजपशी संघर्ष करून अखेर मिळवल्या. पुण्याच्या जागेवर पार्थ पवार यांचे मित्र विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात शिंदे संघर्ष करून राष्ट्रवादीने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. तेथून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली. तटकरे स्वतः रायगडचे खासदार आहेत. त्यांची मुलगी आदिती तटकरे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे आणि आता त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे हा पुन्हा एकदा विधान परिषदेत पोहोचला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप खलबते झाली. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रात मंत्री करण्याचा मानस होता. परंतु भुजबळ यांच्या अटी आणि शर्ती त्यांच्या अंगाशी आल्या. मी राज्यसभेत जाण्यास तयार आहे परंतु माझ्या जागेवर रिक्त होणाऱ्या मंत्रीपदावर माझे पुतणे समीर भुजबळ यांना लगेचच नियुक्त करावे अशी अट भुजबळ यांनी पक्षाच्या बैठकीत घातली. परंतु भुजबळ यांच्या अटी आणि शर्ती केराच्या टोपलीत टाकण्यात आल्या. अखेर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी बाजी मारली. त्यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. भुजबळ यांनी नेहमीप्रमाणे बैठकीत खूपच आकांड तांडव केला. परंतु तेवढ्यापुरती त्यांची समजूत घालण्यात आली आणि त्यांना माध्यमांसमोर आणण्यात आले. परंतु भुजबळ हे प्रचंड नाराज असल्याचे त्यावेळी जाणवत होते.

प्रदेशाध्यक्ष तटकरे हे स्वतः खासदार ,त्यांची मुलगी मंत्री ,मुलगा आमदार मग माझ्या पुतण्याला मंत्री करण्यास काय हरकत आहे? अशी बोंबाबोंब अद्यापही भुजबळ करत आहेत. अजितदादांनी सुरुवातीला भुजबळ यांना मंत्रिमंडळातच घेतले नव्हते. शेवटी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागली. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापनेच्या वेळी असलेले पहिले अध्यक्ष होते. त्यावेळी प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा चांगला उपयोग करून घेतला. नव्या मंत्रिमंडळात त्यांना उपमुख्यमंत्री पद हे दिले. त्याचबरोबर गृहमंत्री पद ही त्यांना मिळाले. परंतु तेलगी प्रकरणात भुजबळ यांची आणि पक्षाची बरीच बदनामी झाली. त्यानंतर भुजबळ यांचा उतरता आलेख सुरू झाला.

राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर भुजबळ हे आपल्याला विधानसभेत हैराण करतील त्यामुळे भाजपने प्रथम भुजबळ यांना तुरुंगात टाकले. त्यानंतर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनाही तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू झाली होती. परंतु भुजबळ यांचे काही समर्थक तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडल्याने त्याची अटक टळली. त्यानंतर भुजबळ यांचाही सुटकेचा मार्ग मोकळा झाला. तुरुंगातून सुटल्यानंतर आक्रमक भुजबळ बॅकफूटवर गेले. विधानसभेतही उरलेली वर्षे त्यांनी शांत बसून काढली.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून भुजबळ मंत्री झाले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर अजित दादा यांच्यासोबत छगन भुजबळ प्रथम गेले. या वयात पुन्हा त्यांची तुरुंगात जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे अजित दादा यांच्यासोबत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला.

या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सत्तेत आल्यानंतर अजितदादा यांनी त्यांना मंत्रिमंडळा बाहेर ठेवले. त्यामुळे भुजबळ बरेच अस्वस्थ होते. अखेर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळाबाहेर जावे लागल्याने त्यांची वर्णी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात लागली. परंतु भुजबळ यांचा आक्रमकपणा अजून काही गेलेला नाही. आपल्या पुतण्यासाठी त्यांनी यावेळी पराचा कावळा केला. परंतु पक्षाने त्यांच्या अटी शर्तीना फारशी भीक घातली नाही. भुजबळ यांची उपयुक्तता आता संपत आली आहे हे पक्षाच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांना आता बॅकफूटवर जाण्या वाचून पर्याय नाही.

राज्यसभा उमेदवार खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मर्जीतला देऊन सर्वांनाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार आणि पार्थ पवार यांनी माध्यमांना खोटे पाडले आहे.

– नितीन सावंत,
9820355612

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech