विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे आवाहन
(अनंत नलावडे)
मुंबई : विकसित भारत-२०४७ हे संपूर्ण देशाचे स्वप्न असून ते साकार करण्यासाठी जागरूक समाज, सक्षम लोकशाही संस्था आणि उत्तरदायी लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत, असे आवाहन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी मंगळवारी हरियाणा विधानसभेच्या वतीने चंदीगड येथे आयोजित सीपीए भारत विभाग झोन-२ परिषदेत बोलताना केले.परिषदेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, हरियाणा विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण आणि विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
प्रा.शिंदे म्हणाले की, लोकशाहीची ताकद केवळ मतदानात नसून विधायक चर्चा, संवाद आणि लोकहिताच्या निर्णयांमध्ये आहे.संसद आणि विधानमंडळांमधील दर्जेदार चर्चा लोकशाही अधिक मजबूत करतात.’विकसित भारत-२०४७’ या उद्दिष्टाचा उल्लेख करताना त्यांनी गरिबीमुक्त, तंत्रज्ञानसंपन्न आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याचेही आवाहन त्यांनी केले.
लोकप्रतिनिधींनी जनतेचा विश्वास जपत विकासाभिमुख निर्णय घ्यावेत, असे सांगत त्यांनी लोकशाहीसाठी ‘फोर-डी’ (Four-D) सूत्र मांडले – Debate, Discussion, Decide आणि Do Not Disturb. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था असल्याचे नमूद करत त्यांनी लोकशाही मूल्ये आणि संसदीय परंपरा अधिक मजबूत करण्याचेही आवाहन केले. त्याचवेळी विकसित भारत-२०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी समाज आणि लोकप्रतिनिधींनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, असेही प्रा.शिंदे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.